Aerial View of Ramadham

Ramadham – A home away from home

सहजीवन सुंदर आणि समृद्ध होण्यासाठी गरज असते समविचारी लोकांच्या सहवासाची. हा सहवास आपल्याला नेहमीच हवाहवासा वाटतो कारण आपण आतून प्रसन्न आणि शांत असतो. रमाधाममध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा अनुभवही काहीसा असाच आहे. व्यक्ती भिन्न असल्या तरी त्यांचे विचार मात्र एकसारखे आहेत हे इथे आलेल्या प्रत्येकाला जाणवल्याशिवाय राहत नाही. यातूनच सुरु होतो मैत्रीचा प्रवास. एकमेकांशी बोलून, आपली सुख-दुःख सांगून इथला प्रत्येकजण एक वेगळं, नवीन नातं तयार करू बघतो. आपल्या घरातही आपण असेच एकमेकांशी संवाद साधून आपलं नातं घट्ट करतो नाही का, पण फरक इतकाच असतो की घरातल्या लोकांशी आपण रक्ताच्या नात्याने अथवा इतर कोणत्या नातेसंबंधांमुळे आधीच जोडले गेलेलो असतो. रमाधाम मधला प्रत्येक जण अशाच आपल्या वाटणाऱ्या नात्याची सुरवात इथे करतो आणि ही नाती शेवटपर्यंत त्यांची सोबत करतात. त्यामुळे घरापासून दूर असलं तरी रमाधाम हे इथल्या प्रत्येकासाठी दुसरं घरंच आहे.

घरात आपण आपल्या सोयीप्रमाणे वस्तूंची मांडामांड करतो, सुखसोयी निर्माण करतो. रमाधामच्या टीमनेही इथल्या प्रत्येकाचा विचार करत अशाच सुखसोयी निर्माण केल्या आहेत. प्रशस्त व हवेशीर खोल्या, स्वच्छ व अद्ययावत सोयींनी युक्त स्वच्छतागृह, सामान ठेवण्यासाठी सुरक्षित कपाटं, सुसज्ज स्वयंपाकघर व डाईनिंग एरिया अशा सर्व सुविधा इथे आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा विचार रमाधामच्या बांधकामातही केला गेलाय हे इथल्या छोट्या उंचीच्या पायऱ्या असणाऱ्या जिन्यांवरून आपल्या लक्षात येतं, शिवाय इथे व्हीलचेअरचीही सोय आहे.

रमाधामचं आणखी एक आगळं- वेगळं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या आजूबाजूचा निर्सग आणि स्वच्छ हवा. खोपोलीमध्ये उभी असलेली ही वास्तू हिरवळीने नटली आहे. इथल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी खास पार्क्स आणि वॉकिंग ट्रॅक्स बनवले गेले आहेत. इतकंच नाही तर इथल्या स्वयपांकात रमाधाममध्ये लागवड केलेल्या भाज्या वापरल्या जातात.

आहे ना अगदी तुमच्या घरासारखं घर!

या अशा जागी तुमचे पालक फक्त सुरक्षितच नाही तर समाधानी आणि आनंदीही राहतील यात शंका नाही!

कोणीतरी म्हणून ठेवलंच आहे की,

“घर असावे घरासारखे,

नकोत नुसत्या भिंती,

तिथे असावा प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती.

त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी,

सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी!

तुमच्या पालकांसाठीचं हक्काचं आनंदी 'घर' म्हणजे रमाधाम!