Peaceful view from corridor

रमाधाम – एक आनंद वास्तू

ज्याला भविष्य दिसतं आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी जो अविरत कष्ट घेतो तो खरा नेता! असाच एक द्रष्टा आणि कणखर नेता म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे.

बाळासाहेबांच्या कोणत्याही निर्णयामागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या मीनाताई म्हणजे ममतेचं मूर्तिमंत रूप. अशी दोन सहृदयी, खंबीर आणि दूरदृष्टी असणारी माणसं जेव्हा एखादा प्रकल्प हाती घ्यायचं ठरवतात तेव्हा तो प्रकल्पही तितकाच खास आणि मोठा असतो.  असाच एक प्रकल्प म्हणजे ‘रमाधाम’.

रमाधामची कल्पना बाळासाहेब व मीनाताईंना सुचली ती संत गाडगे महाराजांवरील एका चित्रपटामुळे. ह्या चित्रपटात संत गाडगे महाराजांनी निराधारांसाठी बांधलेल्या धर्मशाळांबद्दल एक प्रसंग होता. हा प्रसंग पाहताना मीनाताई बाळासाहेबांना म्हणाल्या की, “तुम्हीही असा एखादा आश्रम का नाही सुरु करत?”. बाळासाहेबांनाही ही कल्पना खूप आवडली आणि त्यांनी तात्काळ होकार दिला. स्वखर्चाने बाळासाहेबांनी १९९० साली रमाधामची स्थापना केली.

आयुष्यातले चढ-उतार, अडचणी, आव्हाने हे सगळं यशस्वीपणे पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एक समाधानी, शांत आणि संपूर्ण असं आयुष्य जगता यावं ह्या हेतूने रमाधामची निर्मिती केली गेली. इथे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ही जागा अगदी त्यांच्या घरासारखी आपली आणि सुरक्षित वाटावी यासाठी इथला स्टाफ प्रयत्नशील असतो. खोपोलीच्या शुद्ध,स्वच्छ व निसर्गरम्य वातावरणात उभी असलेली ही वास्तू खऱ्या अर्थाने ज्येष्ठ नागरिकांसाठीचा ‘आनंदधाम’ च आहे!

आधुनिक सुविधांसह ‘रमाधाम’ मध्ये एक विलक्षण आपलेपणा आहे जो इथल्या ज्येष्ठ नागरिकांना भावतो. समवयस्क व समविचारी लोक आजूबाजूला असताना मनही प्रसन्न राहतं. आपण आपल्या खऱ्या कुटुंबापासून दूर आहोत असं इथल्या कोणालाही वाटत नाही यातच रमाधामच्या टीमचं खरं यश आहे. गप्पा गोष्टी, एकत्र जेवण करणं, एकमेकांना आधार देत परस्परांची सुख-दुःख जाणून घेऊन  इथल्या ज्येष्ठ नागरिकांनी एक वेगळंच नातं एकमेकांशी जोडलं आहे. ‘Home is where the heart is!’ या उक्तीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच ‘रमाधाम’!